Bike Rally
Jivhala

श्रीगुरुजी रुग्णालयात देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा " भारतदेश परत एकदा आपल्याच देशाची संकल्पना असलेल्या रामराज्याकडे वाटचाल करत आहे" असे प्रतिपादन रॉयल हेरीटेजचे श्री निरंजनभाई शहा यांनी श्रीगुरुजी रुग्णालयात आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमात केले. श्रीगुरुजी रुग्णालयात देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झेंडावंदन श्री. निरंजनभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. शहा यांनी भारताचा उज्वल इतिहास , श्रीगुरुजी रुग्णालयाची वाटचाल आणि भविष्य काळातील भारत देशातील वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने याविषयी विस्तृतपणे आपले विचार व्यक्त केले. हर घर तिरंगा आता 'हर घर उत्साह' झाला आहे. 75 वर्षांपूर्वीचा भारत आणि आजचा भारत यामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. सर्वांना आधार वाटावा, विश्वास वाटावा आणि सुरक्षितता वाटावी असा देश गेल्या 75 वर्षात आपण घडवू शकलो आणि गेल्या सात आठ वर्षात तर त्याला प्रचंड गती मिळाली, असे विचार श्रीगुरुजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर यांनी यावेळी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले नुसती इच्छा असून भागत नाही तर त्या इच्छेला जोड लागते कामाची, जोड लागते नियोजनाची आणि सर्वांच्या सुदैवाने गेल्या आठ-दहा वर्षात ते घडतंय. पण केवळ नियोजनाने भागत नाही तर प्रत्येकाला आपला खारीचा वाटा उचलावा लागतो आणि हा खारीचा वाटा उचलण्याचे आपण सर्वांनी गेल्या 14 वर्षांपूर्वी ठरवले. आरोग्य क्षेत्रामध्ये नाशिकमध्ये चांगली सुविधा उपलब्ध झाली पाहिजे या ध्येयाने आपण सर्वजण जोडले गेलो. त्यामुळे आज श्रीगुरुजी रुग्णालयाचा आरोग्य क्षेत्रात नाशिकमध्ये वेगळा असा ठसा उमटला आहे. ज्यावेळी मला समाजामध्ये बाहेर एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठीचा योग येतो त्यावेळी सगळी मंडळी श्रीगुरुजी रुग्णालयाचे कौतुक करतात. अशा प्रसंगी खरोखर माझा ऊर भरून येतो. हे कौतुक स्वीकारण्याचा मान मला मिळतो, पण काम मात्र आपण सर्वजण करत असता. मला असं वाटतं की हे काम आपापल्या स्थानी प्रत्येक जण करत आहे म्हणून आज आपला देश जगात आदर्श ठरत आहे. या 75 वर्षाच्या निमित्ताने आपण परत संकल्प करूया, आपला असलेला संकल्प आणखीन दृढ करूया. भारत मातेसाठी जे जे आपणास शक्य आहे ते ते आपण करूया आणि या कार्यात अनेकांना जोडून घेऊया असे आवाहन डॉ. गोविलकर यांनी यावेळी केले. याच कार्यक्रमात श्रीगुरुजी रुग्णालयाच्या जिव्हाळा या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी CPR देवून चांदवड घाटात एका वृद्धाचा जीव वाचवल्याबद्दल रुग्णालयाचे नेत्र विभागातील कर्मचारी श्री. निलेश पवार यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यवाह श्री.प्रवीण बुरकुले यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात रुग्णालयाचे उपाध्यक्ष श्री. मुकुंद खाडिलकर तसेच, डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी गण मोठया संख्येने उपस्थित होते. ध्वजवंदन कार्यक्रमानंतर श्रीगुरुजी रुग्णालयाची मोटार सायकल रॅली श्रीगुरुजी रुग्णालय ते अशोक स्तंभ व परत रुग्णालय अशी आयोजित केली होती. या रॅलीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह दांडगा होता. सुमारे 50 मोटरसायकलच्या माध्यमातून 100 जणांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला. शहीद चौकात सर्वांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी श्री. अनिरुद्ध तेलंग यांनी सुंदर आवाजात आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम् सादर केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आली.